Thackeray Bandhu : 'आम्ही दोघं बंधू ...' मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray's Big Statement About The MNS Alliance : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांतील गोंधळ, ओळख पटवण्याच्या निकषांवरून त्यांनी 'अघोषित NRC' (नागरिक नोंदणी) लागू झाला आहे का? असा सवाल उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. अनेक मतदारांना स्वतःची ओळख पुन्हा पुन्हा पटवावी लागत आहे. ही प्रक्रिया पाहता, देशात कुठलाही अधिकृत निर्णय न घेताही NRC सारखी प्रणाली अंमलात आली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.”
त्यांनी स्पष्ट केलं की, सीएए आणि NRC संदर्भात देशभरात एकेकाळी मोठी आंदोलनं झाली होती. त्यावेळीही "ओळख पटवा" हाच केंद्रबिंदू होता. आता मतदारालाच स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागत असल्याने, निवडणूक आयोगाने या संदर्भात जनतेला स्पष्ट माहिती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
व्हीव्हीपॅटविना निवडणुका? – निवडणूक प्रक्रियेवर सवाल
ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही मत व्यक्त करताना म्हटले, “ईव्हीएमवर आधीच शंका आहे आणि आता व्हीव्हीपॅट मशिनच न वापरण्याचा निर्णय घेण्यात येतोय. जर निवडणूक प्रक्रियाच अपारदर्शक ठेवायची असेल, तर मग निवडणुका घेण्याचा फार्स का करायचा?”
त्यांनी म्हटलं की, व्हीव्हीपॅटमुळे मतदाराला आपल्या मताची खात्री मिळते. बॅलेटपेपरवर पूर्वी जसं स्पष्ट दिसायचं, तसं आता रहिलेलं नाही. त्यामुळे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी व्हीव्हीपॅट अनिवार्य असावं, असंही ते म्हणाले.
"आम्ही निर्णय घेण्यास सक्षम, तिसऱ्याची गरज नाही" – उद्धव ठाकरेंचा स्पष्ट संदेश
दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी INDIA आघाडीतील अंतर्गत संबंधांवर आणि केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांवर जोरदार भूमिका मांडली. राज ठाकरे यांच्याबरोबरच्या संबंधांबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं, "आम्ही दोघं भाऊ निर्णय घेण्यास सक्षम आहोत. जे करायचं आहे ते आम्ही करू, त्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची गरज भासत नाही."
राहुल गांधींच्या जेवणाच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद
दिल्लीत ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या जेवणाच्या निमंत्रणावरही प्रतिक्रिया दिली. "राहुल गांधींनी मला जेवणासाठी बोलावलं आहे. मी नक्की जाणार आहे. दरवर्षी मी दिल्लीत येतोच," असं ते म्हणाले. यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भातील चर्चा पूर्ण झाल्यानंतर माध्यमांशी अधिक माहिती शेअर केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी आंदोलनावरून सरकारवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची आठवण करून देत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. "तेव्हा हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसले होते. काही जणांचे प्राण गेले. पण तेव्हा सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही," अशी टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा समोर आणला.
ते पुढे म्हणाले, “त्या वेळी शेतकऱ्यांवर दडपशाही केली गेली. कुंपण लावलं, भिंती उभारल्या, त्यांना नक्षलवादी ठरवलं. मग 'आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत' असं म्हणणाऱ्यांना तेव्हा का आठवण आली नाही?”
उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरही उपस्थित केला प्रश्न
प्रेस कॉन्फरन्सदरम्यान उपराष्ट्रपतींच्या तडकाफडकी राजीनाम्यालाही ठाकरे यांनी हायलाईट केलं. “उपराष्ट्रपतींनी अचानक राजीनामा का दिला? राजीनाम्यानंतर ते आहेत कुठे? यावरही चर्चेची गरज आहे,” असं त्यांनी नमूद केलं.