Pankaja Munde : “बीडमधील राजकीय अतिक्रमण काढू”,पंकजा मुंडेंचं वक्तव्य...
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये वकील व डॉक्टर असोसिएशनच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बीड शहरातील विकास, पर्यावरणाबाबतचे आव्हान आणि राजकीय अतिक्रमणावर थेट भाष्य केले.
“ग्रामविकास मंत्री असताना विकास केला; आता पर्यावरणाचे काम हाती”
बैठकीत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ग्रामविकास मंत्री असताना ग्रामीण भागात अनेक विकासकामे केली. आज मी पर्यावरण मंत्री आहे आणि बीड शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखणे, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण हे माझे प्राधान्य आहे.” त्यांनी स्पष्ट केले की बीड शहरात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने निस्तारण न होता शहराच्या सौंदर्यावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. त्या म्हणाल्या “बीडमधून तयार होणारा सर्व कचरा बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याची आम्ही योजना आखत आहोत. शहर स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी बनवण्याचा आमचा संकल्प आहे.”
“बीडमधील राजकीय अतिक्रमण काढू”, पंकजा मुंडे
शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत पंकजा मुंडेंनी टोकाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “बीड शहरात फक्त भौतिकच नव्हे तर ‘राजकीय अतिक्रमण’ झाले आहे. हे अतिक्रमणही आम्ही काढणार आहोत. यामुळे शहर विकासाला अडथळा येतो.” तथापि, त्यांनी विरोधी नेत्यांवर कोणतीही व्यक्तिगत टिप्पणी करण्याचे टाळले. “मी कोणावरही टीका करणार नाही. पण शहराच्या विकासाशी जो प्रश्न निगडित असेल त्यावर ठाम भूमिका घेत राहीन,” असे त्या म्हणाल्या.
योगेश क्षीरसागर प्रकरणावर ठाम भूमिका
बीडमधील चर्चेचा विषय ठरलेल्या योगेश क्षीरसागर प्रकरणावरही पंकजा मुंडेंनी भाष्य केले. त्यांनी सांगितले, “कुणावरही अन्याय होत असेल तर ते मला सहन होत नाही. योगेशने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली तेव्हा मला जाणवले की त्या प्रश्नावर न्याय मिळणे गरजेचे आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “योगेशवर झालेला अन्याय मला मान्य नाही. त्याला न्याय देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.” नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बीडमध्ये रंगणार नवा राजकीय रंग नगर परिषदेची निवडणूक जवळ आल्याने बीडमध्ये राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. पंकजा मुंडेंच्या या बैठकीने बीडच्या राजकारणाला नवा कल दिला आहे. त्यांनी विकास, पर्यावरण आणि न्याय या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतल्याने आगामी निवडणुकीत हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडेंचे स्पष्ट विधान –
“बीडचे पर्यावरण सुधारू, कचरा प्रक्रिया उद्योग उभारू आणि शहरातून राजकीय अतिक्रमण दूर करू.” या भूमिकेमुळे बीड शहरात नवे राजकीय समीकरण आकार घेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
