Ganeshotsav 2025 : ज्येष्ठा गौरी आगमन, पूजन आणि विसर्जनाच्या तारखा व मुहूर्त काय आहेत? जाणून घ्या...
Jyeshtha Gauri 2025 : गणेशोत्सवात गौरीपूजनाला विशेष महत्त्व आहे. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ज्येष्ठा गौरीचे आगमन रविवार, 31 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.25 वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्रात करावे. त्यानंतर सोमवार, 1 सप्टेंबर रोजी पूजन होईल, तर मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी रात्री 9.50 वाजेपर्यंत मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे. परंपरेनुसार गौरी या पार्वतीमातेचे प्रतीक मानल्या जातात व त्यांना महालक्ष्मी असेही संबोधले जाते.
गौरी पूजनावेळी तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या स्वरूपात गौरी आणल्या जातात. नैवेद्य अर्पणाची प्रथा असून काही ठिकाणी चौसष्ट प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य केला जातो. या सणाला सासरी गेलेली कन्या माहेरी येते आणि तिच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी केली जाते.
यावर्षी गणेशमूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.25 ते दुपारी 1.54 पर्यंत आहे. त्या वेळेत प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा करता येईल. जर या वेळेत शक्य झाले नाही तर सूर्योदयापासून दुपारी 1.54 पर्यंत स्थापना करता येईल. महिलांनाही गणेशपूजन करण्यास हरकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गणेशपूजनामागील मुख्य उद्दिष्ट भक्तिभाव, नेतृत्त्वगुण, मातृ-पितृभक्ती व दुर्गुणांचा नाश करण्याची प्रेरणा आहे. गणपती सुखकर्ता-दुःखहर्ता असल्यामुळे आपणही समाजातील दुःख दूर करण्यासाठी तत्पर राहावे, असा संदेश या उत्सवातून दिला जातो. पूजेसाठी मातीची गणेशमूर्तीच वापरावी, सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरावे, तसेच विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पुढील वर्षी ज्येष्ठ अधिकमास असल्यामुळे गणेशोत्सवाचे आगमन 18 दिवस उशिरा होईल. त्यामुळे 2026 मध्ये गणेश चतुर्थी सोमवार, 14 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.