Raj Thackeray Meets Sanjay Raut : तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी, भेटीत काय काय घडलं?
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (3 नोव्हेंबर) शिवेसना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंनी यावेळी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली.ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊतांची बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनीराज ठाकरेंच्या या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आमच्या घरी आल्याचं सुनील राऊत म्हणाले.
संजय राऊत आजारी आहेत. राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. संजय राऊतांना यूएसला नेलं पाहिजे की अन्य काही केले पाहिजे, याबाबत राज ठाकरे माझ्याशी बोलत होते, अशी माहिती सुनील राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या घरी आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, असं सुनील राऊत म्हणाले. तसेच राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जवळपास 25-30 मिनिटं चर्चा झाली. राज ठाकरेंनी यावेळी संजय राऊतांना सल्ला दिला. तुझा ज्याप्रकारचा आजार आहे, त्यानूसार तुला राहावं लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा, असा सल्ला राज ठाकरेंनी संजय राऊतांना दिल्याची माहिती सुनील राऊतांनी दिली. तसेच मी आधी घरी आलेलो तेव्हा वेगळ्या प्रकारची एन्ट्री होती. त्यावेळी रोड कसा होता, याबाबतही राज ठाकरेंनी चर्चा केल्याचं सुनील राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांना गंभीर आजाराचे निदान झाले होते. सोशल मीडियावर याबाबत संजय राऊत यांनी स्वत: माहिती दिली होती. सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्लाडॉक्टरांनी त्यांना दिला होता.संजय राऊत यांनी या आजारावर उपचार करण्यासाठी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही सांगितले होते. परंतु, संजय राऊत यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.
