सिरीयात काय सुरुये? असाद पॅलेसमध्ये सापडला भलामोठा बोगदा
सीरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कस वर ताबा मिळवला आहे. याबरोबरच सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकल्याचे रविवारी सरकारी वाहिनीवरून बंडखोरांनी जाहीर केले आहे. दमास्कस येथील प्रसिद्ध मशिदीतून सीरियामधील बंडखोरांनी हा ऐतिहासिक विजयाची घोषणा केली.
दीड दशकांपासून गृहयुद्धाच्या चकमकीत असलेल्या सीरियातील लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत आहेत. राष्ट्राध्यक्षांनी देशातून पळ काढल्यानंतर त्यांच्या घरासह सर्व काही आता बंडखोर आणि सीरियन लोकांच्या ताब्यात आहे.
काय घडतंय सिरीयात?
असाद पॅलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपती भवनात लूटमार झाली आहे. राजवाड्यात प्रवेश करणाऱ्या लोकांचे फोटो-व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे जो सर्वात आश्चर्यकारक आहे.
असद टनेल
राष्ट्रपती भवनात घुसलेल्या लोकांनी एक बोगदा शोधून काढला आहे. आणि या भल्या मोठ्या लांब बोगद्याचा व्हिडिओ आता समोर येताना दिसत आहे. हा बोगदा एवढा मोठा आहे की त्याच्या आत सूचना फलकदेखील आहेत. बोगद्याच्या दोन्ही बाजूला अनेक खोल्या आणि बैठकीच्या खोल्या आहेत. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंपासून ते आलिशान सोफे, महागडे फर्निचर, बाथरूमसारख्या अनेक गोष्टी आहेत. याशिवाय त्याठिकाणी सर्व्हर रूम आणि मोठी तिजोरी देखील आहेत. शेवटी बाहेर पडण्यासाठी पायऱ्याही आहेत. मात्र, सीरियातील बंडखोरांना काही खोल्या उघडता आल्या नसल्याचं या व्हिडिओत दिसून येत आहे. या खोल्यांचे अवजड दरवाजे बघून त्यांच्यात काहीतरी खास असेल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.