AB form : राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये उमेदवारांना देतात तो एबी एबी फॉर्म म्हणजे काय?
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या उमेदवार नियुक्ती प्रक्रियेत ‘एबी फॉर्म’ हा शब्द वारंवार कानावर येतो. अनेकदा वृत्तपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर एखादा उमेदवार एबी फॉर्म नाकारला गेला म्हणून बंडखोरी केली अशा बातम्या वाचायला किंवा ऐकायला मिळतात. पण नेमके एबी फॉर्म म्हणजे काय आणि तो कसा वापरला जातो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
सरळ शब्दांत सांगायचं तर एबी फॉर्म म्हणजे राजकीय पक्षाकडून उमेदवाराला दिला जाणारा अधिकृत उमेदवारी अर्ज होय. हा अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो आणि त्यात उमेदवाराची वैयक्तिक माहिती, पक्षाची मान्यता, तसेच संबंधित मतदार संघाशी संबंधित अधिकृत माहिती असते. जे उमेदवार एबी फॉर्मसह अर्ज करतो, तोच त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो आणि त्यालाच पक्षाचे चिन्ह मिळते.
एबी फॉर्ममध्ये दोन भाग असतात – ए फॉर्म आणि बी फॉर्म. ए फॉर्ममध्ये मान्यता प्राप्त राजकीय पक्ष, मुख्य निवडणूक अधिकारी, तसेच संबंधित मतदार संघाचे निवडणूक अधिकारी यांच्यात अधिकृत पत्राचा नमुना असतो. या फॉर्मवर पक्षाचा शिक्का व अध्यक्ष किंवा सचिवांची सही असते, ज्यामध्ये कोणाला अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, हे नमूद केलेले असते.
बी फॉर्म हा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठवण्यात येणारा पत्राचा नमुना असतो. यात पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे आणि त्याला पक्षाचे चिन्ह मिळावे याची शिफारस असते. तसेच, काही कारणांमुळे ए फॉर्म अर्ज बाद झाल्यास, कोणत्या उमेदवाराला पर्यायी उमेदवारी दिली जाईल, हे बी फॉर्ममध्ये नमूद केलेले असते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, एबी फॉर्म ही प्रक्रिया पक्ष आणि उमेदवार दोघांनाही सुरक्षित ठेवते. एखाद्या उमेदवाराच्या अर्जाच्या छाननीत तांत्रिक कारणांमुळे अडचण आल्यास, पक्ष बी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या पर्यायी उमेदवाराला अधिकृतपणे निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे एबी फॉर्म निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक ठरतो आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची ओळख सुनिश्चित करतो.
