Alphanso Mango : आंब्याला 'हापूस' किंवा 'अल्फान्सो' नाव का पडलं? जाणून घ्या या व्हिडीओतून
हर्षल जाधव, प्रतिनिधी
फळांचा राजा आंबा. पण त्यातही हापूस म्हटलं तर तोंडाला पाणी सुटतंच. कोकणात उत्पादन होणाऱ्या हापूसला देशासह जगभरात मोठी मागणी असते. तेजस्वी पिवळा, मधुर गंध, गोड चव, रसरशीत मऊ गर अशा गुणांसाठी हा आंबा लोकप्रिय आहे. हापूस आंब्याला अल्फान्सो असंही म्हटलं जातं.. पण आंब्याला हापूस किंवा अल्फान्सो असं नाव का पडलं? ते या व्हिडीओतून जाणून घेऊयात.
आंब्याच्या नामकरणात भारतात आलेल्या पोर्तुगिजांचा मोठा वाटा आहे. पोर्तुगीज लष्करातील अधिकारी अल्फान्सो द अल्बुकर्क यांच्यामुळे अल्फान्सो हे नाव पडलं. त्यांनी गोव्यात फिरुन आंब्यांच्या विविध जातींवर प्रयोग करत आंब्याची नवी जात विकसित केली. त्यावरुन या आंब्याला अल्फान्सो असं नाव मिळालं.. पण नावाचा अपभ्रंश होऊन गोवा आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक या आंब्याला अफूस म्हणू लागले. महाराष्ट्रात इतर ठिकाणी या आंब्याच्या जातीचा प्रसार होईपर्यंत त्याचा उच्चार 'हापूस' असा झाला होता.
महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. आंब्यांच्या महत्त्वाच्या जातींमध्ये हापूस, पायरी, दशेरी, लंगडा, केसर, सुवर्णरेखा, नीलम, तोतापुरी, गोवा माणकूर, बेंगनपल्ली, हिमसागर, बनेशन, ओलूर यांचा समावेश आहे.