रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? जाणून घ्या
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आपल्या रोजच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतो हे पाहणं गरजेचं आहे. कारण या तेलाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहित असायला हवं.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकघरात फोडणीसाठी काय वापरणं चांगलं असतं. आयुर्वेदामध्ये तेल हा शब्द तीळावरून आलेला आहे. तीळ तेल अभ्यंगासाठी उत्तम असलं तरी स्वयंपाकासाठी वापरणं चांगलं नसतं.
उत्तर भारतात मोहरीचं तेल वापरलं जाते पण मोहरी उष्ण असल्यामुळे काश्मीर, हिमाचल प्रदेशासारख्या थंड प्रदेशात मोहरीचं तेलाचा आहारात समावेश केल्यास चालू शकतं, पण सरसकट सर्व सिझनमध्ये आणि संपूर्ण भारतात मोहरीचं तेलाचा आहारात समावेश करता येत नाही.
दक्षिण भारतात खोबरेल तेल वापरलं जातं ते सुद्धा तिथल्या उष्ण वातावरणात शरीराला गारवा देण्याच्या दृष्टीनी चांगलं असतं. पण मध्य भारतात म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान यासारख्या ठिकाणी फोडणीसाठी घरी बनवलेलं साजूक तूप किंवा भुईमुगाचं म्हणजे गोडं तेल वापरणं चांगलं असतं. भुईमुग थोडे उष्ण असतात पण जमिनीखाली येत असल्यामुळे वातशामक असतात तसंच पौष्टिकही असतात.