11th Admissions Website : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प; राज्यभरात संतापाची लाट
राज्यात यंदा प्रथमच संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असतानाच, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प झाल्याने हजारो विद्यार्थी व पालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. बुधवारी सकाळपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, अधिकृत संकेतस्थळ सतत बंद राहत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा संयम सुटू लागला आहे. सकाळी संकेतस्थळावर "502 Bad Gateway" असा त्रुटी संदेश झळकत होता. त्यानंतर दुपारपर्यंत "संकेतस्थळाचे काम सुरू आहे" असेही लिहून आले. या तांत्रिक अडचणीमुळे सकाळपासून अर्ज भरण्याच्या तयारीत असलेले विद्यार्थी व पालक सायबर कॅफे किंवा घरी संगणकासमोर ताटकळत बसले होते. ही स्थिती पाहता प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यंदा राज्यभरातून 13,02,873 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या प्रवेशासाठी 20,91,390 जागा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर 21 मेपासून प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. यापूर्वी ही ऑनलाईन प्रक्रिया फक्त मोजक्या महानगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित होती. मात्र, यंदा ती संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तज्ज्ञांनी याआधीच या ऑनलाईन प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याचे आज दिसून आले. विद्यार्थ्यांना सुरळीत सेवा मिळावी म्हणून हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असला, तरी तोही काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक पालकांनी हेल्पलाईनवर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळालाच नाही.
शिक्षण संचालनालयाकडून यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर संकेतस्थळाचे तांत्रिक काम सुरू असून लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडथळ्यामुळे विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जात असल्याचे चित्र आहे. या सगळ्या गोंधळामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून पालकांत तीव्र नाराजी आहे. अद्याप अनेकांना अर्ज प्रक्रिया कशी पार पाडायची याबाबतच संभ्रम आहे. तांत्रिक गोंधळाची ही वेळेत दखल घेतली नाही, तर प्रवेश प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.