Maharashatra Election : प्रचाराचा शेवटचा दिवस कोण गाजवणार?

Maharashatra Election : प्रचाराचा शेवटचा दिवस कोण गाजवणार?

आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रचारावर बंदी लागू होणार आहे.
Published on

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रचारावर बंदी लागू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे रोड शो, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या आणि दारोदारी भेटी थांबतील.

अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचारात मोठी ताकद लावली होती. विशेषतः मागील तीन दिवसांत प्रचाराचा जोर अधिकच वाढलेला दिसून आला. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, रॅली, पदयात्रा आणि घराघरांत जाऊन संवाद साधण्यावर भर दिला. आज शेवटचा दिवस असल्याने अनेक उमेदवार सकाळपासूनच मतदारांच्या दारात पोहोचून शेवटची भेट देत असल्याचे चित्र आहे.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संयुक्त सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सभेची राज्यभर चर्चा झाली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत सभा घेत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला. शेवटच्या टप्प्यातील या जाहीर सभांमुळे प्रचाराला निर्णायक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार करण्यास मनाई असते. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा प्रचार, सभा, रॅली किंवा सोशल मीडियावरून मतदारांवर प्रभाव टाकण्यास बंदी असते. तसेच मतमोजणी होईपर्यंत ड्राय डे पाळण्यात येतो. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आज सायंकाळी ५.३० नंतर राज्यभरात प्रचाराच्या तोफा थंडावणार असून मतदार आता शांतपणे मतदानासाठी विचार करणार आहेत. आता सर्वांचे लक्ष १५ जानेवारीच्या मतदानावर केंद्रीत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com