Aaditya Thackeray : मतदार यादीतील घोळ कोण सोडवणार ?.. आदित्य ठाकरेंचा सवाल..
राज्यातील मतदारयादीतील गंभीर घोळांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मतदारयादीत इतक्या तक्रारी आहेत, पण हे सगळे घोळ नेमके सोडवणार कोण?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत महिलांना जाहीर केलेले 2100 रुपये अजूनही मिळालेले नाहीत. “फक्त घोषणा केल्या जात आहेत, पण प्रत्यक्षात लाभ कुठे आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “भाजपच्या फसव्या घोषणा आणि खोट्या आश्वासनांना जनता बळी पडू नये. निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासने ही केवळ मतांसाठीची आहेत.”
राज्यातील लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी मतदारयादीतील पारदर्शकता, महिलांना दिलेले आश्वासन आणि जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर सरकारने तातडीने उत्तर द्यावे, अशी मागणी केली.राजकीय वातावरण तापले असताना, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा हल्लाबोल महत्त्वाचा मानला जात आहे.
