सध्या जगभरात 'डुम्सडे फिश' या माशाची चर्चा आहे. केरळमधील किनाऱ्यावर अलीकडेच मासेमाऱ्यांच्या जाळ्यात एक अजब आणि दुर्मीळ मासा अडकला आहे, ज्याने स्थानिकांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘ओअरफिश’ नावाने ओळखला जाणारा हा मासा सामान्यतः खोल समुद्रात राहतो आणि फारच क्वचित पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतो. हा मासा केवळ त्याच्या असामान्य दिसण्यामुळे चर्चेत नसून, त्याच्या भोवती गुंफलेल्या गूढ विश्वासांमुळेही तो चर्चेचा विषय बनला आहे.
जपानी लोककथांनुसार, ओअरफिश हा समुद्रातील देवदूत मानला जातो आणि तो वर येतो तेव्हा त्यानंतर नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते, असं मानलं जातं. 2025 या वर्षात आधीच अनेक दुर्घटना घडल्या आहेत. पहलगामधील हल्ल्यापासून ते अहमदाबादच्या विमान अपघातानंतर आता इंद्रायणी पुलाच्या दुर्घटनेपर्यंत. अशा पार्श्वभूमीवर ओअरफिशचं वर येणं हा काही लोकांच्या मते अधिक धोक्याचा इशारा ठरू शकतो.
हा मासा 30 फूट 9 मीटर लांबीचा एक महाकाय मासा असून तो समशीतोष्ण महासागरांमध्ये 200 ते 1000 मीटर खोलीवर राहतो. त्यांचे शरीर सापासारखे लांब आणि त्वचा चांदीसारखी चमकदार असते. त्याच्या शरीरावर छोटे पंख असतात, त्याच्या या रुपामुळे तो दिसायला भयंकर दिसतो. हवामान बदल, समुद्राचे तापमान वाढल्यास तसेच हा मासा आजारी असल्यास किंवा त्याचा मृत्यू जवळ आल्यास ते किनाऱ्यावर आढळून येतात.
भारतात केरळमध्ये आढळलेला डुम्सडे फिश याआधी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लॉस एंजेलिस, जपान, मेक्सिको, टास्मानिया आणि कॅलिफोर्निया याठिकाणी आढळला आहे. हा मासा आढळताच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली आहे.
ज्यावेळेस हा मासा कॅलिफोर्नियाच्या सॅन दिएगो किनाऱ्यावर दिसला होता तेव्हा तो 12 फूट उंचीचा ओअरफिश होता. त्याच्या दोन दिवसांनंतर लॉस एंजेलिसमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता.
त्याचसोबत 2010 मध्ये जपानच्या किनाऱ्यावर अनेक मृत मासे वर आले होते. त्यानंतर 2011 मध्ये जपानच्या तोहोकूमध्ये भूकंप आणि त्सुनामी आले होते. ज्यामुळे जपानसाठी ते वर्ष विनाशकारी ठरलं होत. त्यावेळेस भूकंपात 15,000 हून लोक मृत्युमुखी पावले होते.