Akhil Chitre : “वक़्त का इंतज़ार करो, गद्दारों…” अखिल चित्रेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ
“वक़्त का इंतज़ार करो, गद्दारों। आने वाला शोर बताएगा हम खामोश क्यों थे।” असा सूचक आणि आक्रमक आशय असलेला ट्वीट शिवसेना नेते अखिल चित्रे यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या ट्वीटचा नेमका रोख कुणाकडे आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले असून, राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ लावले जात आहेत. सध्या मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचाली, महापौर पदाचा तिढा आणि शिवसेना-भाजप यांच्यातील अंतर्गत समीकरणे या पार्श्वभूमीवर अखिल चित्रेंचं हे ट्वीट महत्त्वाचं मानलं जात आहे. “गद्दार” असा थेट उल्लेख आणि “आम्ही का खामोश होतो, हे येणारा शोर सांगेल,” असे म्हणत त्यांनी आगामी घडामोडींचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
या ट्वीटमुळे सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही समर्थकांनी या वक्तव्याला पाठिंबा देत “सत्य लवकरच समोर येईल” अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर विरोधकांनी हे केवळ भावनिक वक्तव्य असून कोणताही ठोस अर्थ नाही, असा आरोप केला आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, हे ट्वीट म्हणजे आगामी राजकीय घडामोडींची नांदी असून, काही मोठा खुलासा किंवा राजकीय निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अखिल चित्रे यांनी या ट्वीटमध्ये कोणाचाही थेट उल्लेख केलेला नाही. मात्र ‘गद्दार’ हा शब्द वापरल्याने हा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष, गटबाजी आणि सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर या ट्वीटला अधिक महत्त्व दिले जात आहे.
दरम्यान, अखिल चित्रेंनी या ट्वीटबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी पुढील कोणतीही पोस्ट न करता शांतता पाळल्याने चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. “खामोशी” आणि “आगामी शोर” या शब्दप्रयोगांमुळे राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, एका ओळीच्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या ट्वीटचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
