Chief Minister of Karnataka : काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चिघळला! सिद्धारामय्या ‘धोक्यात’? डीके गटातील आमदारांची दिल्ली धाव
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची राजकीय हालचाल वेगाने सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने उचल खाल्ली असून त्यांचे समर्थक मंत्री व आमदार दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत. सूत्रांनुसार, शिवकुमार यांचे जवळचे मंत्री एन. चलुवरायसामी तसेच आमदार इक्बाल हुसैन, एच. सी. बालकृष्ण, एस. आर. श्रीनिवास आणि टी. डी. राजेगौडा यांनी दिल्ली गाठली असून ते काँग्रेस नेतृत्वाशी भेट घेणार आहेत. आमदार टी. डी. राजेगौडा यांनी संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी भेटही घेतली आहे.
सिद्धारमैया सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्याने ठरलेल्या सूत्रानुसार आता नेतृत्वबदल व्हावा, अशी शिवकुमार गटाची भूमिका आहे. हे नेते लवकरच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपली बाजू मांडणार आहेत. दरम्यान, डी. के. शिवकुमार यांचे भाऊ आणि माजी खासदार डी. के. सुरेश यांनी सिद्धारमैया आपल्या अडीच वर्षांच्या आश्वासनावर ठाम राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
‘माझे सरकार सुरक्षित’ — सिद्धारमैया
मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मात्र नेतृत्वबदलाच्या चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे सांगितले. त्यांनी आपले सरकार “आताही आणि पुढेही स्थिर राहील” असे म्हटले. लोकांची कामे पार पाडणे हेच आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले.
पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार का, असा प्रश्न केल्यावर त्यांनी हे सर्व “अनावश्यक वाद” असल्याचे सांगितले. केवळ मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत चर्चा सुरू होती आणि त्यातूनच मुख्यमंत्री बदलाचा विषय पुढे आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन मंत्रीपदे अद्याप रिक्त असून ती लवकरच भरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
थोडक्यात
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची राजकीय हालचाल वेगाने सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने उचल खाल्ली असून त्यांचे समर्थक मंत्री व आमदार दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांडशी चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत.
सूत्रांनुसार, शिवकुमार यांचे जवळचे मंत्री एन. चलुवरायसामी तसेच आमदारांनी संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी भेटही घेतली आहे.

