पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही : अमेय खोपकर
पाकिस्तानी कलाकाराला विरोध दर्शवत पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाली आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान अभिनीत 'अबीर गुलाल' हा हिंदी चित्रपट येत्या ९ मे रोजी भारतात प्रदर्शित होणार असून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राज्य सरकारला निवेदन दिले जाणार आहे. मनसे चित्रपट सेचेने प्रमुख अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रथम निवेदनातून चित्रपट प्रदर्शित न होण्याची मागणी करू, नाही ऐकल्यास आमच्या स्टाईलने याला उत्तर देऊ, असा इशारा यावेळी अमेय खोपकर यांनी दिला आहे.
यावेळी अमेय खोपकर म्हणाले की, "पाकिस्तानी कलाकारांना इथे आणायची गरजच काय, त्यांना इथे काम करू देण्यास आमचा पूर्ण विरोध आहे. पाकिस्तानी कलाकारांनी भारताबाहेर काय शूट करायचंय ते करावे. हे कलाकार पाकिस्तानमध्ये जाऊन आपला विरोध करतात. त्यांना आपण भारतात का आणावे. पाकिस्तानी क्रिकेटपटू इथे येत नाहीत. हिंदीतील चित्रपट निर्मात्यांनाही पाकिस्तानी कलाकार इथे येणे मान्य नाही. हा अबीर गुलाल चित्रपट जो कोणी डिस्ट्रिबूट करेल, त्यांचे इतर चित्रपटही प्रदर्शीत होऊ देणार नाही. याबाबत सरकारला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. सरकारने जर ठोस भूमिका घेतली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने याला उत्तर देईल," असे खोपकर म्हणाले.
चित्रपटाचे दिग्दर्शन आरती ए. बागडी यांनी केले असून इंडियन स्टोरीज आणि ए रिचर लेन्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. निर्मात्यांमध्ये विवेक बी. अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी यांचा समावेश आहे. फवाद खान, वाणी कपूर, रिद्धी डोगरा, लिसा हेडन, फरीदा जलाल, सोनी राझदान, परमीत सेठी आणि राहुल वोहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात भारत आणि ब्रिटनमधील सहाय्यक कलाकार आहेत.