ZillaParishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार?,आयोगाची आज पत्रकार परिषद

ZillaParishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार?,आयोगाची आज पत्रकार परिषद

महाराष्ट्रात सध्या २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्रात सध्या २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या गदारोळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकांचे पडघम सुरू असतानाच राज्यात ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महापालिका निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उच्च न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आजच या निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांसाठी मतदान होऊ शकते. राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत.

मात्र, यापैकी १७ जिल्हा परिषदा आणि ८८ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने सध्या त्या ठिकाणी निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत बसणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्याच निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांसाठीची प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. महापालिका निवडणुकांनंतर लगेचच ग्रामीण भागातील निवडणुकांची घोषणा झाल्यास राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही तासांत निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com