शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात नाट्यमय वळण लागणार?
Team Lokshahi

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात नाट्यमय वळण लागणार?

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या कथित हल्लाप्रकरणाचा तपास येत्या काही दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात नाट्यमय वळण लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या कथित हल्लाप्रकरणाचा तपास येत्या काही दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात नाट्यमय वळण लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवाळीनंतर तळकोकणातील राजकारणात घडामोडी घडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. कोकणात पुन्हा शिवसेना उभारण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात जाधव आणि राणे पिता-पुत्रांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घराजवळ पेट्रोल भरलेली बाटली, स्टॅम्प आणि दगड आढळले होते. बंगल्याच्या आवारात आढळलेल्या या वस्तूंमुळे हा हल्ल्याचा प्रयत्न होता का, अशी चर्चा सुरू झाली. त्या दरम्यान जाधव यांनी आपली सुरक्षा कमी केली असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनीदेखील या घटनेचा तातडीने तपास सुरू केला. आठवडाभरात प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com