Devendra Fadnavis : उज्ज्वल निकम यांची बीड प्रकरणी नियुक्ती होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करु दिला नाही. सगळ्या गोष्टी तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही. तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेऊनच त्याचा तपास केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करु दिलं पाहिजे. कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखे एक वकिल आपण नियुक्त करावे असा आपला प्रयत्न आहे. त्यांना आपण विनंती देखील केलेली आहे. पण मला विश्वास आहे ते सकारात्मक निर्णय घेतील. त्यांनी मला सांगितले की, विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात. हे मला योग्य वाटत नाही.
मला असं वाटते की, देशामध्ये अनेक वकिल आहेत. जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षामधून निवडणुका लढलेले आहेत. त्याचे राजकारण होत नाही. परंतु उज्ज्वल निकम साहेब यांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखं आहे. उज्ज्वल निकम यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यांनी केस घेतली की, खरे गुन्हेगार असतात त्यांना शिक्षा होतेच. आता कुणाला त्यांना वाचवायचे असेल तर ते उज्ज्वल निकम यांचा विरोध करतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.