Anganwadi News : महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकाराने अंगणवाड्यांमध्ये नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात
राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेमध्ये बदल घडवण्यासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषण, आरोग्यसेवा आणि लसणीकरण करता येणार आहे. त्यासोबतच मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यासाठी राज्यातील १.१० लाख अंगणवाड्यांमध्ये 'आधारशिला बालवाटिका' नवीन उपक्रम राबवला जाईल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या नव्या शिक्षणाची अंमलबजावणी होईल.
राज्यात सध्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1 लाख 10 हजार 631 अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाडीतील बालकांसाठी "आकार " हा अभ्यासक्रम आधी कार्यान्वित होता. आता तो बदलुन "आधारशिला बालविकास " हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम लागू करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका आणि साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात नवीन अभ्यासक्रमाची गरज खुप आधीपासूनच निर्माण झाली होती. या नवीन सुधारित अभ्यासक्रमामुळे बालकांना शाळेत जाण्यापूर्वी एक मजबूत पाया मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना पुढील शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. खेळ आणि कृतींवर आधारित शिक्षण पद्धतीचा यामध्ये समावेश असल्यामुळे विद्यार्थांना शिक्षण घेण्यामध्ये अधिक आनंद येईल.
शिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी 'जादुई पिटारा', ई-पिटारा, आधारशिला किट्स, नवचेतना आणि प्री-स्कूल एज्युकेशन किट्स यांसारख्या शिक्षणसाहित्याचा वापर करण्यात येणार आहे. हे साहित्य खेळावर धारित आणि असल्याने मुलांच्या भाषिक, सामाजिक विकासावर भर देईल, असा शासनाचा विश्वास आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे अंगणवाडीतील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त केला आहे. या अभ्यासक्रमात बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच, त्यांच्या भाषिक आणि संज्ञानात्मक कौशल्यांचा विकास साधण्यावरही भर दिला जाईल. त्यामुळे बालके प्राथमिक शाळेत जाण्यासाठी अधिक सक्षम होतील. शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी आणि संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. ज्यामुळे हा अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.