Beed Crime : बीडमध्ये उधारीच्या वादातून महिलेला मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Woman Beaten up in Beed Over Borrowed Money After Minor Dispute : बीडमध्ये गुन्हेगारी काही संपण्याचे नाव घेत नाहीये. केज तालुक्यात उधारीच्या पैशाच्या वादातून एका महिलेला निर्घृण मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला गदळे या महिलेवर कालिंदा डोईफुडे हिने सकाळच्या वेळेत घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चंद्रकला गदळे यांनी कालिंदा डोईफुडे यांच्याकडे दिलेले उधारीचे पैसे परत मागितले होते. त्यावरून दोघींमध्ये वाद निर्माण झाला. चंद्रकला गदळे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधताना सांगितले की, “मी सकाळी उठून घरात झाडू मारत होते, तेवढ्यात कालिंदा दारातून आत आली आणि केसाला धरून फरफटत बाहेर ओढलं. नंतर रस्त्यावरून मला ओढत नेऊन तिने मारहाण केली.”
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारहाणीचे कारण फक्त उधारीचे पैसे मागणे हेच आहे. चंद्रकला गदळे यांच्या घरात शिरून मारहाण करण्यात आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रकला यांनी पुढे सांगितले, “ती बाई सकाळी सकाळी आली, मला घरात गाठून केस पकडून फरफटत रस्त्यावर नेलं. मला सगळ्यांसमोर मारहाण केली. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली त्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.