Yugendra Pawar Engagement : युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न; मुंबईत पवार कुटुंब पुन्हा एकत्र
Yugendra Pawar Tanishka Kulkarnis Engagement Ceremony : आज युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. यानिमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकत्र पाहायला मिळले. या सोहळ्याला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत राहिले होते. हा सोहळा प्रभादेवीतील इंडिया बुल्स बिल्डिंग येथे, तनिष्काच्या निवासस्थानी पार पडला. या खास प्रसंगी पवार कुटुंबातील अनेक नेते आणि सदस्य उपस्थित होते, ज्यामुळे राजकीय कुटुंबातील एकात्मतेचा भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.
हा समारंभ नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या एका भव्य कौटुंबिक सोहळ्यानंतर झाला . अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठ्या थाटात साजरा झाला होता. सलग दोन साखरपुडे झाल्याने पवार कुटुंबात सध्या आनंदाचे आणि एकतेचे वातावरण आहे. या समारंभाचे विशेष महत्त्व आहे, कारण युगेंद्र पवार यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, ज्यामुळे पवार कुटुंबातील पिढीगत विचारसरणीतील फरक अधोरेखित झाला होता. मात्र, आजचा सोहळा हे अधोरेखित करतो की राजकीय विचार वेगळे असले तरी कुटुंबाचे बंध दृढ आहेत.
सध्या सोशल मीडियावर या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल होत असून, त्यामध्ये हसतमुख शरद पवार आपल्या कुटुंबीयांसह आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. गेल्या काही आठवड्यांतला हा दुसरा साखरपुडा पवार कुटुंबातील नव्या पिढीचा टप्पा तर आहेच, पण त्याचबरोबर कुटुंबातील नव्याने आलेली एकजूटही दर्शवतो.