Zakir Khan : न्यूयॉर्कमध्ये जाकिर खानचा इतिहास रचणारा परफॉर्मन्स; हिंदीत स्टँड-अप करणारा पहिला भारतीय कॉमेडियन
भारतीय स्टँड-अप कॉमेडी जगतातील लोकप्रिय नाव जाकिर खानने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. न्यूयॉर्कच्या जागतिक कीर्तीच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन या प्रतिष्ठित सभागृहात जाकिर खानने हिंदीत स्टँड-अप कॉमेडी परफॉर्म करून अभूतपूर्व कामगिरी केली. यामुळे तो या सभागृहात हिंदीत परफॉर्म करणारा पहिला भारतीय कॉमेडियन ठरला आहे.
या अविस्मरणीय क्षणानंतर जाकिर खानचे नाव जगभर चर्चेत आले असून, संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षकांनी अनेक मिनिटे टाळ्यांचा कडकडाट करत उभे राहून जाकिरला दाद दिली. या प्रसंगामुळे जाकिर स्वतःही भावूक झाला आणि प्रेक्षकांना हात जोडून आभार मानले. जाकिर खानच्या या ऐतिहासिक शोमध्ये स्टेजवर प्रसिद्ध कॉमेडियन तन्मय भट्टदेखील सहभागी झाला होता. दोघांच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. जाकिरच्या विनोदशैलीतून आलेले किस्से, त्याची भाषा आणि स्वाभाविक अंदाज यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
जाकिर खानने स्वतः या शोची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तो टाइम्स स्क्वेअरमधील 'द गार्डन हॉल'मध्ये स्टेजवर उभा असल्याचे दिसते. त्याच्या परफॉर्मन्सनंतर संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जाकिरच्या या यशाबद्दल भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कलाकारांकडूनही शुभेच्छा येत आहेत. इराणी कॉमेडियन मॅक्स अमीनी, भारतीय कॉमेडियन वीर दास, गायक विशाल ददलानी, अभिनेते पूरब झा, अभिनेत्री तब्बू आणि जरीन खान यांच्यासह अनेकांनी जाकिरला या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
जागतिक दर्जाच्या सभागृहात पूर्णपणे हिंदीत केलेला हा शो भारतीय कॉमेडी जगतातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. आजवर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये जगप्रसिद्ध गायक, अभिनेते आणि कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. त्यात आता जाकिर खानने हिंदी कॉमेडीचा ठसा उमटवला आहे. जाकिर खानच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय भाषांना आणि कलाक्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे समीक्षकांनी नमूद केले आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि उभे राहून दिलेला सन्मान यामुळे जाकिर खानची ही परफॉर्मन्स यात्रा भारतीय स्टँड-अप कॉमेडीच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरली आहे.