TRP च्या रिंगणात पुन्हा एकदा झी मराठीची दमदार तयारी; तेजश्री प्रधान आणि 'आम्ही सारे खवय्ये' शोचे पुनरागमन
मराठी मनोरंजन विश्वात टीआरपीसाठी चढाओढ अधिकच वाढली असून, स्टार प्रवाहच्या मालिकांनी मागील काही वर्षांत प्रेक्षकांच्या मनात ठोस स्थान निर्माण केलं आहे. झी मराठी, जी कधी काळी घराघरात लोकप्रिय होती, ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवण्यासाठी सज्ज झाली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या अनेक जुन्या मालिकांनी निरोप घेतला आहे. त्यानंतर चॅनलनं नव्या कथानकांसह आणि नवीन दमाच्या कलाकारांसह नवीन मालिकांचा आरंभ केला आहे.
झी मराठीच्या या नव्या योजनेत अभिनेत्री तेजश्री प्रधानचा पुनरागमन विशेष लक्षवेधी ठरत आहे. ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘अगबाई सासूबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांतून घराघरात पोहोचलेली तेजश्री आता नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच ती ‘वीण दोघांतलीही तुटेना’ या मालिकेतून 'झी मराठी'वर झळकली आहे. तेजश्री प्रधानप्रमाणेच अभिनेत्री शिवानी सोनारदेखील पुन्हा एकदा 'झी मराठी'वर झळकणार आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शिवानी, आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे.
याच दरम्यान, झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक खास उपस्थिती नोंदवली आहे. या विशेष एपिसोडमधून त्याच्या ‘आम्ही सारे खवय्ये’ या लोकप्रिय कुकिंग शोच्या पुनरागमनाचा इशारा दिला गेला आहे. सध्या अधिकृत घोषणा झाली नसली तरी या शोच्या पुनश्च सुरूवतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
‘आम्ही सारे खवय्ये’ हा शो पूर्वीपासूनच घरगुती प्रेक्षकवर्गात विशेष लोकप्रिय ठरलेला आहे. त्यामुळे या शोच्या पुनरागमनामुळे गृहिणी आणि खाद्यप्रेमींमध्ये विशेष उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे. 'झी मराठी'कडून ही पावले पाहता, वाहिनी पुन्हा एकदा टीआरपीच्या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावत असल्याचे स्पष्ट होते.