Devendra Fadnavis :  ‘घरच्यांनी घरच्यांसाठी घेतलेली मुलाखत’; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला

Devendra Fadnavis : ‘घरच्यांनी घरच्यांसाठी घेतलेली मुलाखत’; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. अलीकडेच झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “काहींनी घरात बसून मुलाखत दिली, तर काहींनी ती घरच्यांनीच घरच्यांसाठी घेतली. त्यामुळे काही प्रेक्षकांनी टीव्हीही बंद केला असेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला “कन्फ्यूज आणि भ्रष्टाचाराची युती” अशी संज्ञा दिली. यावर बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा उल्लेख करत म्हटलं की, “संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना भ्रष्टाचारी आणि राज ठाकरे यांना कन्फ्यूज म्हटलं, ते त्यांनी बरोबरच ओळखलं.” या विधानातून फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीकेची धार वाढवली.

मुंबईकरपणाच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं. “जन्माने मुंबईकर नाही म्हणून बाहेरचे म्हणता, पण उद्धव ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांना मात्र मुंबईकरांची नाडी आणि संकल्पना चांगली माहिती होती,” असं म्हणत फडणवीसांनी तुलना केली. पुढे ते म्हणाले, “ज्यांचा जन्म मुंबईत झाला ते आज म्हातारे होत आहेत, पण त्यांनी मुंबईसाठी काय केलं, हे दाखवू शकत नाहीत. मुंबईत जन्माला आलो म्हणून फुलं आणि हार घालायचे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या दहा वर्षांत आपल्या सरकारने मुंबईसाठी मोठे बदल करून दाखवल्याचा दावा करत, “ठाकरेंनी एक तरी विकासकाम सांगावं. मी दोन हजार रुपये देतो. आधी प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हजार वाढवले, चला तीन हजार रुपये देतो,” अशी टोलेबाजीही फडणवीसांनी केली. मुंबईतील गरीबांना वसई-विरारच्या पुढे का जावं लागलं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी टाकली.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून, त्यांना शरद पवार गटाची साथ मिळाली आहे. या आघाडीला भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून आव्हान दिलं जात आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापल्याचं चित्र दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com