Sanjay Raut : 'आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत'मुंबई निकालानंतर राऊत आक्रमक
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. प्रतिकूल परिस्थिती, सत्तेचा गैरवापर आणि प्रचंड दबाव असूनही ठाकरे बंधूंनी तब्बल 71 जागा जिंकल्या असल्याचा दावा राऊत यांनी केला. हा निकाल म्हणजे शिवसेनेच्या मूळ विचारसरणीचा आणि मुंबईकरांच्या विश्वासाचा विजय असल्याचे ते म्हणाले.
“आम्हाला सोडून गेलेले अनेक नगरसेवक स्वतःच्या वॉर्डमध्ये पराभूत झाले आहेत. जनतेने गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवला आहे,” असा टोला राऊत यांनी बंडखोर नगरसेवकांना लगावला. शिंदे गटावर निशाणा साधत ते म्हणाले, “शिंदे जयचंद झाले नसते तर आज भाजपाचा महापौर झाला नसता. शिंदे आणि त्यांच्या लोकांनी उघडपणे जयचंदगिरी केली.”
राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर मुंबई विकल्याचा गंभीर आरोप केला. “भाजप-शिंदे सरकारने मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला आहे. मुंबईकरांच्या हितापेक्षा उद्योगपतींच्या फायद्याला प्राधान्य दिले जात आहे,” असे ते म्हणाले. मुंबई ही महाराष्ट्राची शान असून ती कोणाच्याही हातात देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही हा पराभव मानत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे लढा दिला. ही लढाई सत्तेच्या विरोधात, पैशाच्या जोरावर चालवलेल्या राजकारणाविरोधात होती.” ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने संघर्ष केला आणि पुढील काळात हा संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख करताना राऊत म्हणाले, “दुर्दैवाने राज ठाकरेंच्या पक्षाची मदत अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही. जर ही साथ मिळाली असती तर चित्र वेगळे असू शकले असते.” तरीही मुंबईतील लढाई संपलेली नाही आणि शिवसेना पुन्हा नव्या ताकदीने उभी राहील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
