साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ : करवीरनिवासिनी महालक्ष्मी
शक्तीची उपासना माणसाला बळ देणारी, प्रेरणा देणारी ठरते. नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे, सुंदर प्रतिमांचे दर्शन या निमित्ताने घडते. महाराष्ट्रात अशाच वेगवेगळ्या रूपांमध्ये देवीची उपासना केली जाते. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर सोबतच गावोगावी मातृ दैवतांची आराधना करण्याचा परंपरा आहे. स्थान महात्म्याच्या दृष्टीने साडेतीन शक्तीपीठे अतिशय महत्त्वाची आहेत. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, माहूरची श्री रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी ही तीन; तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तीपीठ आहे, असे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार राजा दक्षाच्या यज्ञात देवी सतीने आत्मसमर्पण केले. त्यानंतर भगवान शिव तिचे शव हातात घेऊन विमनस्क अवस्थेत तिन्ही लोकी संचार करत होते. तेव्हा सर्व देवांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या कलेवराचे तुकडे केले. पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तिथे शक्तिपीठांची निर्मिती झाली.शक्ती पूजेच्या मुख्य केंद्रांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे, करवीरनिवासिनी महालक्ष्मी. कोल्हापूर किंवा करवीर हे प्राचीन काळापासून पवित्र ठिकाण मानले गेले आहे. करवीर आणि महालक्ष्मी देवी यांचा राष्ट्रकुट काळातल्या ताम्रपटामध्ये उल्लेख सापडतो. त्यानंतरच्या अनेक राजवंशांनी करवीरनिवासिनी महालक्ष्मीची आराधना केल्याचे उल्लेख सापडतात. मराठी राजसत्तेच्या काळात या देवस्थानला वैभव प्राप्त झाले.
कोल्हापूरचे सध्याचे मंदिर कोणत्या काळात, कोणत्या राजवटीत बांधले गेले; याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. काळ्या पाषाणातील हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. महाद्वारातून आत आल्यानंतर दीपमाळा, पुढे गरुडमंडप, गणेश मूर्ती असलेला दगडी मंडप, आणि त्यानंतर तीन मंदिरे दिसतात. मध्यभागी महालक्ष्मीचे मंदिर आहे. इतर दोन मंदिरे महाकाली आणि महासरस्वती यांची आहेत.हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहे. कार्तिक आणि माघ या महिन्यांमध्ये अतिशय विलक्षण किरणोत्सव येथे अनुभवता येतो. मावळतीची सूर्यकिरणे गाभाऱ्यात प्रवेश करतात, तेव्हा देवीची मूर्ती उजळते.
'आई अंबाबाई 'म्हणून कोल्हापूरची देवी भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. करवीर महात्म्यच्या रचनाकारांनी म्हटले आहे, करवीर नगर हे शक्तीच्या आगमनामुळे 'शक्तीयुक्त' झाले आहे. मनुष्यांना भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्रदान करणारे हे क्षेत्र वाराणसीहून अधिक श्रेष्ठ आहे.