…तर असा आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास!
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. दरम्यान त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दाखवली. पण उर्वरित तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते.
त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात मोठा लढा द्यावा लागला. यात अनेकांना जीवाचे बलिदान द्यावे लागले.
प्रमुख कालखंड : मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणजे १९३८ ते १९४८. याच काळात मराठवाडा निझामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेअनेक राजकिय आंदोलने, विद्यार्थी चळवळी आणि सशस्त्र आंदोलने झाली.
रझाकार संघटनेची स्थापन : विरोध मोडून काढण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने कासीम रझवीच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापन करून मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. संस्थानातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण करून निजामाने स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न केला.
हुकूमशाही राजवटीला उघड आव्हान : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखी चालना मिळाली. यातच निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघड आव्हान म्हणून ७ ऑगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले गेले. याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली.
लढा खेड्यापाड्यात पोहोचला! : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. हैदराबाद संस्थानमध्ये त्याकाळात तेलंगणा, सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत. मुक्ततेसाठी लढा सुरु असताना रझाकारांचे जनतेवर अत्याचार करणे सुरुच होते. मात्र स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा यांसारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला.
…आणि निजामाने माघार घेतली! : 7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्यास सांगितले. त्यानुसार १३ सप्टेंबरला 'ऑपरेशन पोलो' करण्यात आले. पुढे १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो आजचा दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.