लोकशाही स्पेशल
का साजरा केला जातो नवरात्री उत्सव? जाणून घ्या काय आहे महत्त्व
हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस, भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते.असे मानले जाते की दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशची (घटाची) स्थापना केली जाते. परंतु तुम्हाला नवरात्र उत्सव का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
नवरात्रीचे महत्त्व
- हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते. परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून मानली जाते. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचेही वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
- धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त कलश स्थापन (घटस्थापना) करतात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील केला जातो.
नवरात्रीची आख्यायिका
- नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही.
- हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.
- दुसऱ्या एखा कथेनुसार जेव्हा भगवान श्री राम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्री रामाला विजयाचे आशीर्वाद दिले. त्यानंतर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून लंका जिंकली. या दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो.