आज त्रिपुरारी पौर्णिमा; कथा आणि पूजेची पद्धत जाणून घ्या
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.
यावर्षी सोमवारी 7 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदोषकाली कार्तिक पौर्णिमा असल्याने वैकुंठ चतुर्दशीच्याच दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी सायं. 4 वाजून 15 मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होतो. या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावावेत, दीपदान करावे, गंगास्नान करावे आणि कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यावे असा विधी आहे.
त्रिपुरारारी पौर्णिमेसंबंधी दोन कथा आहेत. त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन ‘वर माग' असे सांगितले, त्रिपुराने देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊदे आणि त्यांच्यापासून अभय मिळावे, असा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्यावर ‘तथास्तु' म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासुर भलताच माजला. त्याची तीन पुरे होती. ती आकाशसंचारी होती. त्रिपुर त्या पुरात बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकराला शरण गेले. भगवान शंकरानी त्याची तीन आकाशसंचारी पुरे जाळून टाकली आणि त्रिपुरासुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाली असेल त्या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी' किंवा ‘त्रिपुरी' पौर्णिमा असे नाव मिळाले. लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली दीपोत्सव करून त्रिपुरसंहाराचा आनंद व्यक्त करू लागले.