Holi 2025 : यंदा कधी आणि कशी साजरी होणार होलिका दहन
होळी हा सण हर्षाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा म्हणून साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या होळी या सणाची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहतात. अस असताना होळीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यावर्षी होलिका दहन 13 आणि धुलिवंदन 14 तारखेला साजरी केली जाणार आहे. धुलिवंदनाच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते.
तसेच होळी दहन केल्यानंतर लहान मुलं तसेच तरुण आणि वयस्कर असे सगळे होळीच्या भोवती बोंबा मारत गोल फिरतात. या दिवशी पूजा विधीने होळी पेटवून पुरणपोळीचा नैवैद्य होळीला दाखवला जातो. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी राखेची धुलिवंदन साजरी केली जाते. तसेच 5 दिवसांनी रंगपंचमी खेळली जाते. तर यंदाचे होलिका दहन कधी आणि किती वाजता केल जाणार यावरुन अनेकांचा गोंधळ उडाला आहे. जाणून घ्या होळीनिमित्त होलिका दहनची पूजाविधी, वेळ आणि तिथी.
वेळ आणि तिथी काय जाणून घ्या
यंदा गुरुवारी 13 मार्च 2025 ला सकाळी 10:35 च्या सुमारास पौर्णिमा सुरु होते आहे आणि त्यादिवशी रात्री होलिका दहन केली जाईल आणि होळीची पुजा केली जाईल. तसेच शुक्रवार 14 मार्चला दुपारी 12:23 ला पौर्णिमा तिथी संपन्न होते आहे आणि त्यादिवशी धुलिवंदन साजरी केली जाणार आहे.
जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व
होलिका दहन करण्याआधी होळीची पुजा केली जाते आणि तिच्याकडे सुख, समृध्दी आणि सर्वांना खुश ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. यासाठी होलिकेची पुजा करण्यासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा केली जाते. होळी चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते.
तसेच पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. त्यानंतर गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते. मराठी वर्षाच्या शेवटच्या महिन्याला म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. होळीला होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखले जाते. अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्यासाठी हा सण साजरा केला जातो.