Rang Panchami : पौरणिक कथेनुसार रंगपंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या...
हिंदू धर्मात होळी हा सण वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. होळी सणाच्या बरोबर ५ दिवसनंतर रंगपंचमीचा साजरी केली जाते. यंदा रंगपंचमी 19 मार्चला साजरी करण्यात येणार आहे. रंगपंचमीला श्री पंचमी किंवा देव पंचमी असेही म्हणतात.
रंगपंचमी हा सण होलीका दहनाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी एकामेकांवर रंग- गुलालाची उधळण केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी मित्र- परिवार, नातेवाईक गुलाल आणि विविध रंग लावून रंगपंचमी साजरी करतात. या सणाच्या अनेक धार्मिक कथा आहे. या कथा कोणत्या जाणून घेऊया.
धार्मिक कथेनुसार, या दिवशी देवी- देवताही पृथ्वीवर येतात आणि सर्वसामान्यांसोबत रंग- गुलाल खेळतात. रंगपंचमीच्या आख्यायिकेनुसार, या दिवशी भगवान श्री कृष्णाने राधासोबत रंग खेळले होते. त्यामुळे या दिवशी पुजेच्या विधीनंतर राधा- कृष्णाच्या मुर्तीला रंग लावला जातो. त्यानंतरच रंगपंचमी साजरी केली जाते.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, होळीष्टकाच्या दिवशी कामदेवाने भगवान शंकराची तपश्चर्या मोडली, त्यामुळे भोलेनाथांनी क्रोधित होऊन कामदेवाला जाळून टाकले. यामुळे देवलोकातील सर्वजण दु:खी झाले, परंतु कामदेवाची पत्नी देवी रती आणि देवतांच्या प्रार्थनेवर कामदेवाला जिवंत करण्याचे भगवान शंकराने आश्वासन दिले. त्यामुळे सर्वांनी आनंदी होऊन रंगाची उधळण केली. यामुळे रंगपंचमी साजरी केली जाते.