World Coconut Day : जाणून घेऊया नारळाबद्दल मजेशीर गोष्टी…
खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अनंत उपयोग असलेल्या नारळाचा आज दिवस. नारळाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याबद्दल जगभर जागरूकता निर्माण करणे, हे हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.जगातील बहुतेक नारळ उत्पादक आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात असल्यामुळेच आशियन आणि पॅसिफिक क्षेत्रातल्या देशांमध्ये प्रामुख्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. जागतिक नारळ दिन पहिल्यांदा २००९ मध्ये झाला होता.
फक्त खाद्य व अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाविषयी काही विशेष व मजेशीर बाबी जाणून घेऊया.
● कोकोनट हा नट नसून तो स्टोन फ्रूट आहे.
● नारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते.
● नारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो.
● नारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांनी तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या शतकात जेव्हा या नावाड्यांनी हे फळ समुद्रकिनारी पाहिले तेव्हा त्याचे तीन डोळे त्यांना माणसाच्या दोन डोळे व एका नाकासारखे वाटले. शिवाय ते हंसऱ्या चेहऱ्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला कोको, म्हणजे हसरा चेहरा असे संबोधू लागले. पुढे या नारळाचा प्रवेश इंग्लंडमध्ये झाला तेव्हा कोकोपुढे नट हा शब्द जोडला जाऊ लागला.
● काही देशांमध्ये नारळं तोडण्यासाठी माकडांना प्रशिक्षित केले जाते. ही माकडे नारळाच्या झाडावर चढून नारळे तोडून खाली टाकतात.
● नारळाच्या पाण्याचा मनुष्याच्या रक्तातील प्लाझ्मासारखा काही काळ उपयोग वैद्यक क्षेत्रात केला जाऊ शकतो.