World Health Day | जागतिक आरोग्य दिवस का साजरा केला जातो?
दरवर्षी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस (World Health Day) साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात करोना (Corona) संसर्ग जगातील सर्व देशांमध्ये पसरला. अशा परिस्थितीत जगाला आरोग्य सेवा देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का आरोग्य दिवस फक्त ७ एप्रिललाच का साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची (World Health Organization) स्थापना 1948 साली झाली. याच्या दोन वर्षानंतर 1950 साली जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. अशा प्रकारे आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल रोजी झाली. अशा परिस्थितीत डब्ल्यूएचओच्या (WHO) स्थापना दिनानिमित्त जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 1950 मध्ये प्रथमच WHO शी संलग्न सर्व देशांनी जागतिक आरोग्य दिन साजरा केला. त्यानंतर, जसजसे देश WHO मध्ये सामील झाले, तसतसे दरवर्षी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
आरोग्य दिनाचा उद्देश जगभरातील सर्व देशांमध्ये समान आरोग्य सुविधांचा प्रसार करण्यासाठी लोकांना जागरुक करणे, आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आणि जागतिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे आणि त्या कल्पनांवर काम करणे हा आहे. या दिवशी आरोग्य सेवा, सुविधा आणि काळजी या विषयांवर जनजागृती मोहीम राबवली जाते.