Diwali Food and Recipe: दिवाळीत घरच्या घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट बेसनाचे लाडू, वाचा रेसिपी
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आहे. दिवाळी म्हटलं की, घरोघरी महिनाभर आधीच सगळ्या कामांची सुरुवात होते. साफसफाई, मिठाई, फराळ या सगळ्यांचीच लगबग प्रत्येक घरात दिसून येते. या दरम्यान बाजारातून विकत आणलेले पदार्थ भेसळयुक्त असतील का? याची चिंता सर्वांनाच असते. असे पदार्थ खाल्ल्याने शरीराला हानी पोहचू शकते. हे टाळण्यासाठी आपण घरच्या घरी सोपी रेसिपी वापरून लाडू, चिवडा, चकली यांसारखे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करू शकतो.
शुद्ध तुपाचे बेसन लाडू तुम्ही घरी सहज बनवू शकता. बेसनाचे लाडू बनवण्यासाठी माव्याचीही गरज नाही. बेसनाचे हे लाडू खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असतात. जाणून घ्या बेसन लाडू बनवण्याची सोपी रेसिपी
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
अर्धा किलो बेसन
अर्धा किलो पिठीसाखर
400 ग्रॅम तूप
4 टीस्पून रवा
10-12 काजू
10-12 बदाम
बेसनाचे लाडू बनवण्याची रेसिपी
प्रथम बेसन भाजण्यासाठी एक जाड बुडाचे पातेले घ्या. त्यात बेसनासोबातच तूपही टाका आणि बेसन चांगले भाजून घ्या.
बेसनाचे लाडू बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन व्यवस्थित भाजणे. यासाठी सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवा, मात्र नंतर ती हळूहळू कमी करा.
मध्यम आचेवर सतत ढवळत बेसन व्यवस्थित भाजून घ्या. बेसन जसजसे व्यवस्थित भाजले जाईल तसतसे ते पातळ होईल.
बेसनाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत नीट भाजून घ्या. बेसन भाजायला किमान 25 मिनिटे लागतात.
बेसन भाजल्यावर गॅस बंद करा आणि बेसन थंड होईपर्यंत थोडावेळ ढवळत राहा. कारण, पातेले गरम असल्याने बेसन करपू शकते.
आता दुसऱ्या एका भांड्यात 2 चमचे तूप घालून रवा थोडा भाजून घ्या. आता हा रवा भाजलेल्या बेसनात मिसळा.
आता बेसनाच्या या मिश्रणात पिठीसाखर आणि काजू बदामाचे काप करून टाका.
आता सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करा आणि तुमच्या आवडीनुसार बेसन लाडू वळून घ्या. थंड होऊन थोडे कडक झाले की, हे लादून तुम्ही घरी येणाऱ्या पाहुण्यांना किंवा देवाच्या प्रसादालाही वापरू शकता.