बनवा या पद्धतीने भोगीची स्पेशल भाजी; वाचा रेसिपी

बनवा या पद्धतीने भोगीची स्पेशल भाजी; वाचा रेसिपी

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते.

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन एक भाजी केली जाते. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.

भोगीची भाजी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- घेवडा

- हरभऱ्याचे दाणे (ओला हरभरा)

- काटेरी छोटी वांगे

- बटाटे

- रताळे

- गाजर

- फरसबीच्या शेंगा

- खोबरं (किसलेले)

- तीळ (भाजलेले)

- चिंचेचा कोळ

- गुळ

- लाल तिखट

- गोडा मसाला

- तेल

- जीरे

- हिंग

- कडीपत्ता

- चवीनुसार मीठ

सर्व प्रथम भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या धुवून स्वच्छ करुन घ्या. आता घेवडा सोलून मोठे तुकडे करा. कांटेरी वांग्याला मध्ये चीर देऊन चार भाग करा. बटाटा, गाजर, रताळे सोलून मोठे तुकड्यात कापून घ्या. आता खोबरं आणि तीळ बारीक वाटून घ्या. आता एक कढईत तेल गरम करून त्यात फोडणीचे दिलेले साहित्य घाला. जीरे तडतडले की घेवडा आणि हरभरे घाला. थोडेसे मीठ घालून २ मिनटे परतवा. घेवड्यावर थोडेसे डाग दिसायला लागले की त्यात राहिलेल्या सगळ्या भाज्या घाला. तेलात सगळ्या भाज्या नीट परतून घ्या. आता थोडंस मीठ आणि पाणी घालून झाकण ठेऊन भाज्या शिजू द्या. साधारण १० ते १२ मिनटात भाज्या शिजल्यावर लाल तिखट, गोडा मसाला आणि वाटलेलं वाटण घाला. थोडं गरम पाणी आणि मीठ घालून सगळं नीट मिक्स करा. एक उकळी आल्यावर त्यात गुळ आणि चिंचेचा कोळ घाला. आता त्यात थोडे पाणी घालून अजून एकदा उकळी येऊन तेलाचा तवंग वर दिसू लागला की गॅस बंद करायचा. तुमची भोगीची भाजी तयार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com