भोगीच्या दिवशी कोणती स्पेशल भाजी करतात; रेसिपी जाणून घ्या
भोगी भारतात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. स्त्रिया या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन एक भाजी केली जाते. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
भोगी सणाच्या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी केली जाते. चला तर जाणून घेऊया भोगीची भाजी कशी तयार केली जाते.
साहित्य
- घेवडा
- हरभऱ्याचे दाणे (ओला हरभरा)
- काटेरी छोटी वांगे
- बटाटे
- रताळे
- गाजर
- फरसबीच्या शेंगा
- खोबरं (किसलेले)
- तीळ (भाजलेले)
- चिंचेचा कोळ
- गुळ
- लाल तिखट
- गोडा मसाला
- तेल
- जीरे
- हिंग
- कडीपत्ता
- चवीनुसार मीठ
भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या धुवून स्वच्छ करुन घ्या. आता घेवडा सोलून मोठे तुकडे करा. वांग्याला मध्ये चीर देऊन चार भाग करा. बटाटा, गाजर, रताळे सोलून त्याचे मोठे तुकडे कापून घ्या. आता खोबरं आणि तीळ बारीक वाटून घ्या.
आता एक कढईत तेल गरम करून त्यात फोडणीचे दिलेले साहित्य घाला. जीरे तडतडले की घेवडा आणि हरभरे घाला. थोडेसे मीठ घालून 2 मिनटे परतवा. घेवड्यावर थोडेसे डाग दिसायला लागले की त्यात राहिलेल्या सगळ्या भाज्या घाला. तेलात सगळ्या भाज्या नीट परतून घ्या. आता थोडंस मीठ आणि पाणी घालून झाकण ठेऊन भाज्या शिजू द्या.
साधारण 10 ते 12 मिनटांत भाज्या शिजल्यावर लाल तिखट, गोडा मसाला आणि वाटलेलं वाटण घाला. थोडं गरम पाणी आणि मीठ घालून सगळं नीट मिक्स करा. एक उकळी आल्यावर त्यात गुळ आणि चिंचेचा कोळ घाला. आता त्यात थोडे पाणी घालून अजून एकदा उकळी येऊन तेलाचा तवंग दिसू लागला की गॅस बंद करा. तुमची भोगीची भाजी तयार आहे.