Coconut Burfi Recipe: घरच्याघरी तयार करा झटपट होणाऱ्या पौष्टिक आणि स्वादिष्ट नारळाच्या वड्या

Coconut Burfi Recipe: घरच्याघरी तयार करा झटपट होणाऱ्या पौष्टिक आणि स्वादिष्ट नारळाच्या वड्या

काही खवय्यांना जेवणासोबत तसंच जेवणानंतरही स्वीट डिश खाण्याची सवय असते.
Published by :
Sakshi Patil

काही खवय्यांना जेवणासोबत तसंच जेवणानंतरही स्वीट डिश खाण्याची सवय असते. काहींना मिठाईच्या दुकानातील तर काहींना घरगुती मिठाई खायला आवडते, पण ताटात गोड पदार्थ लागतोच. या लोकांसाठी खोबऱ्याची वडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

अगदी कमीत कमी जिन्नस वापरुन झटपट होणारी ही वडी खायलाही सोपी आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी होईल. पाहूयात ही नारळाची वडी नेमकी कशी करायची?

रेसिपी:

१. सर्वात प्रथम नारळ फोडून त्याच्या खोबऱ्याच्या वाट्या काढून घ्या.

२. सुरीने वाट्यांच्यावर असलेला चॉकलेटी भाग काढून टाका.

३. या राहिलेल्या पांढऱ्या खोबऱ्याचे लहान तुकडे करुन त्यांना मिक्सरमध्ये बारीक करुन त्याचा किस तयार करा.

४. पॅनमध्ये ३ वाटी खोबऱ्याचा किस घालून त्यातील मॉईश्चर जाईपर्यंत तो चांगला परतून घ्या.

५. हे खोबरं थोडं कोरडं झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी ताजी साय आणि अर्धी वाटी दूध घालून पुन्हा चांगले मिक्स करुन घ्या.

६. यामध्ये साधारण १.५ वाटी साखर घालून हे सगळे पुन्हा मिक्स करुन परतून घ्या.

७. थोडे कोरडे आणि चिकट होईपर्यंत हे पॅनमध्ये चांगले परतवा आणि मग गॅस बंद करा

८. एका मोठ्या ताटाला थोडे तूप लावून त्यावर हे खोबरं आणि साखरेचे परतलेले मिश्रण घालून एकसारखे पसरवा.

९. एकसारखे घट्टसर दाबून हे मिश्रण १ ते १.५ तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवा.

१०. त्यानंतर सुरीने याला उभे आणि आडवे काप देऊन याच्या वड्या पाडा.

११. आवडीनुसार यावर बदाम आणि पिस्त्याचे काप लावा आणि वड्या एका डब्यात ठेवा.

टिप्स:

१. दूध आणि साय तसेच ओले खोबरे असल्याने या वड्या हवाबंद डब्यात घालून शक्यतो फ्रिजमध्ये ठेवा, या वड्या ८ ते १० दिवस चांगल्या टिकतात.

२. वड्यांना केशरी रंग हवा असल्यास थोडे केशर किंवा खायचा केशरी रंग घालू शकतो.

३. जर आंब्याचा रस उपलब्ध असेल तर साखर घालताना थोडी साखर कमी करून थोडा आंबा रस घालावा. नारळ आणि आंबाचा स्वाद एकत्र अप्रतिम लागतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com