नारळी पौर्णिमेनिमित्त झटपट तयार करा स्वादिष्ट नारळी भात
नारळीपौर्णिमा हा कोळीबांधवांशी संबधित असा सण आहे. कारण हा सण समुद्राशी असलेले नाते आणि त्याचे ऋण फेडणारा असा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस कोळी बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. पावसाच्या काळात समुद्र हा उसळलेला असतो. याकाळात मासेमारी बंद असते. पण कालांतराने त्याचे रौद्र रुप हे कमी होऊ लागते. बंद केलेली मासेमारी पुन्हा सुरु करण्यासाठी आणि समुद्राला शांत करण्यासाठी त्याला नारळ अर्पण केला जातो. म्हणूनच या सणाला 'नारळी पौर्णिमा' असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही देखील घरी झटपट आणि चविष्ट नारळी भात तयार करु शकता.
अर्धी वाटी तांदूळ
नारळाचे दूध
मीठ
तूप
3-4 लवंग
3-4 वेलची
वेलची पावडर
दालचिनीचा एक तुकडा
जायफळ पावडर
अर्धी वाटी गूळ
केशरचे दूध
बदाम, काजू आणि मणुके
तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप गरम करुन घ्या. त्यामध्ये तीन ते चार लवंग, दालचिणीचा तुकडा आणि तीन ते चार वेलची टाका. ते फ्राय करुन घ्या. यामध्ये लगेच तांदूळ टाकून एक व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर नारळाचे दूध टाकून हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. भाताला उकळी येऊन तो चांगला शिजल्यानंतर अर्धा कप गूळ घाला. भाताला सुंदर रंग येण्यासाठी केशरचे दूध, चिमूटभर वेलची पावडर, जायफळ पावडर आणि चवीसाठी चिमूटभर मीठ टाकायचे आहे. त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन एक वाफ काढून घेऊ शकता. तयार आहे तुमचा नारळी भात