PNB Scam | जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये दाखल
पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिका हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे. डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली त्याला तेथे 51 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतातून फरार झाल्यानंतर चोक्सी 2018 पासून अँटिग्वा आणि बार्बुडा येथे वास्तव्यास आहे. त्याने तिथलं नागरिकत्वही घेतले आहे.
चोक्सीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे. तर चोक्सीचं अपहरण करण्याचा कट होता, असा दावा त्याच्या वकिलानं केला आहे. डोमिनिका हायकोर्टाने चोक्सी (62) ला त्याच्या उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे. अँटिग्वाच्या न्यूजरूमच्या वृत्तानुसार, 10 हजार ईस्टर्न कॅरिबियन डॉलर्स (जवळपास पावणे तीन लाख) भरल्यानंतर कोर्टाने चोक्सीला अँटिग्वा येथे जाण्यास परवानगी दिली. जामीन मिळण्यासाठी चोक्सीनं आपला मेडिकल रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. ज्यात 'सीटी स्कॅन'चा समावेश होता.