बघ, मनसेची आठवण येते का? राज ठाकरेंच्या शिलेदाराची विडंबन कवितेतून भावनिक साद
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती. मात्र, तरीही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात १२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी मनसेचे उमेदवार उभे केले होते. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. कल्याणमध्ये राजू पाटील हे मनसेचे विद्यमान आमदारदेखील पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या मान्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं आहे. राज ठाकरे यांनी निकालानंतर पुण्यामध्ये पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधला आणि पराभवाची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे मनसेच्या शिलेदाराने फेसबुकवर कविता लिहित मनसैनिक तसेच महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक साद घातली आहे. संदीप पाचंगे यांच्या कवितेची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
कवितेतून पाचंगे यांची भावनिक साद
महाराष्ट्रातील मराठी माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या कवितेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. मराठी भाषेचा आग्रह, शाळांना गणपतीची सुट्टी, टोल, भोंगे, मराठी तरूणांना रोजगार, हिंदू सण-उत्सव, मासांहारावरून मराठी माणसाला मुंबईत घर नाकारणं, महिलांवरील अत्याचार या सगळ्या मुद्द्यांवरून मनसेने उभारलेला लढा आपण पाहिलाच आहे. समाजातील या प्रश्नांना सोडवण्यासाठी मनसेची तुम्हाला आठवण येते का असा सवाल करत पाचंगे यांनी मराठी मनाला भावनिक साद देण्याचा प्रयत्न केला आहे. कवी सौमित्र यांची गाजलेली कविता बघ माझी आठवण येते का? या कवितेचं विडंबन केलं आहे. त्यांची कविता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह राजू पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव असे आघाडीचे शिलेदारही पराभूत झाले. ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना आव्हान देणारे मनसे उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनाही पराभवाचा धक्का बसला. पाचंगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे.
संदीप पाचंगे यांची कविता-
बघ माझी (मनसे) आठवण येते का?
सकाळी घरातून कामाला जायला निघ रिक्षावाल्याला विचार स्टेशनला येतो का? तो म्हणेल "हिंदी मे बात करो" तू चिडशील महाराष्ट्रात मराठीतच बोलावे लागेल म्हणशील तो उर्मटपणे बोलेल 'हिंदी राष्ट्रभाषा है,नही बोलूंगा'
बघ माझी आठवण येते का?
गणपतीसाठी कोकणात गावी जायला ट्रेनची बुकिंग करमुले CBSE, ICSE शाळेत शिकत असतील, ते म्हणतील डॅडी आमची परीक्षा आहे, शाळेला सुट्टी नाही
बघ माझी आठवण येते का?
गाडी काढ घरच्यांना घेऊन फिरायला जा रस्ता खराब असेलच, खड्ड्यातून मार्ग काढ टोल लागेल.. गुपचूप टोल भर
बघ माझी आठवण येते का?
मुलगा मुलगी दहावी-बारावीची परीक्षा देत असतीलसकाळी सहा वाजता उठून अभ्यासाला बसतील अचानक भोंग्याचा आवाज येईल तुला विचारतील बाबा भोंगे तर कोर्टाने बंद करायला सांगितले ना?
बघ माझी आठवण येते का?
मुलं मोठी झाली की त्यांना, रेल्वेत भरती व्हायचे असेल सर्व जागा महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यातील तरूणांना मिळतील ते विचारतील बाबा महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरीची संधी आहे हे न कळता बाकीच्या राज्यात कसे काय कळते?परीक्षा मराठीत का होत नाहीत?
बघ माझी आठवण येते का?
दहीहंडी,गणेशोत्सव यासारख्या सणांवर कोर्टाचे व सरकारचे निर्बंध येतील, मुलं विचारतील लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरू केला होता ?हिंदू सण पूर्वीसारखेच का साजरे होत नाहीत
बघ माझी आठवण येते का?
मुंबई ठाण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पाहशील बॅकेतून कर्ज काढ घर घ्यायला जामांसाहार करतोस म्हणून तुला घर नाकारतील
बघ माझी आठवण येते का?
कामावरून घरी थकून भागून येशील बायको सांगेल छकुलीचा शाळेत विनयभंग झालाय…तुझी तळपायाची आग मस्तकात जाईल, पोलिसात तक्रार करायला जाशील, कारवाईला टाळाटाळ होईल, व्यवस्थेची चीड येईल,हताश होशील
बघ मनसेची आठवण येते का?
खरं तर मनसेची आठवण यावी असे खूप प्रसंग येतील असो सहज सुचले म्हणून लिहून टाकले सोशल मीडियावर तुमचा महाराष्ट्र सैनिक… संदीप पाचंगे