लोणावळा रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांचं आक्रोश आंदोलन
लोणावळा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केवळ कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठीच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळे पुणे मुंबई रेल्वे प्रवासी सध्या मोठ्या चिंतेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर टाळेबंदीत शिथिलता आणून रेल्वे प्रशासनाने लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला खरा, मात्र मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या हालअपेष्टा सुरूच आहेत.
पहिल्या लाटेनंतर आधी महिलांसाठी आणि नंतर काही निर्बंधांसह सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच पुन्हा लोकल सर्वसामान्यांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली. सध्या पुण्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी डेक्कन क्वीन ही एकच गाडी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे, परंतु ही एक्स्प्रेस एकदा पुण्यातून सुसाट सुटली की थेट लोणावळा,दादर,आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथेच थांबते,त्यामुळे पिंपरी-चिंचवड सह मावळ, कर्जत, कल्याण येथील चाकरमान्यांचे हाल होतात. त्यामुळे दुसरीकडे रेल्वेचा मासिक पासही देण्यात यावा, नोकरीनिमित्त मुंबईत जाताना रोज सकाळी तिकीट खिडकीवर वेळ वाया जातो.
त्यामुळे कामगार वर्गाचा विचार व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेने सिंहगड एक्सप्रेस आणि महालक्ष्मी कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन या मागण्यांना केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांनी लोणावळा रेल्वे स्टेशनवर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.