एक पूर्ण पीठ ‘माहूरची श्री रेणुकामाता’
शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे माहुरगडची श्री रेणुका. नांदेड जिल्ह्यात माहूर या ठिकाणी देवीचे मंदिर आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या शक्तिस्थानामुळे येथील वातावरण पवित्र झाले आहे.
पौराणिक संदर्भानुसार रेणुका ही देवी अदितीचे रूप आहे. यज्ञातून आलेली राजा रेणूची कन्या म्हणून रेणुका असे नाव ठेवण्यात आले. पुढे जमदग्नी ऋषींशी विवाह झाल्यानंतर रेणुका ही भगवान परशुरामाची माता म्हणून त्याविषयी कथा पुराणात आहे. रेणुकेला येल्लम्मा, मरिअम्मा या नावानेही ओळखले जाते. देवीच्या अमूर्त तांदळा रूपाविषयी एक कथा सांगितली जाते. वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आजपर्यंत कोणीही आलेले नसेल, अशी भूमी परशुरामांना हवी होती. तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माहूरची निवड त्यांनी केली. रेणुका मातेने अग्निप्रवेश केला. त्यापूर्वी परशुरामांना दूर जाण्यास सांगितले. मात्र आईच्या आठवणीने परशुराम परत आले. तोपर्यंत शिर सोडून बाकी सर्व देह अग्नीत सामावला होता; म्हणूनच माहूरला देवीचे फक्त शिर आहे.
परशुरामांना या डोंगरावर मातेचे दर्शन झाले, म्हणून त्याला मातापूर म्हटले गेले. शेजारी आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर असे नाव रूढ झाले.माहूर गडावर देवीचे मंदिर यादव काळात बांधलेले आहे. गाभाऱ्यातील देवीचा मुखवटा पाच फूट उंचीचा असून सिंहासनावर आरूढ आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. एकूणच निसर्गाचे सौंदर्य आणि शक्तीस्थानाचे पावित्र्य यामुळे आदिशक्तीचे हे ठिकाण भाविकांसाठी महत्त्वाचे आहे.