‘हा माज तुमच्या घरी दाखवा’,सुनील कांबळेंवर रुपाली चाकणकरांची सडकून टीका
राज्यातील महिला अत्याचारांवरील घटनामुळे काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. असाच एक प्रकार पुण्यातील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजपा आमदाराने हा माज आपल्या घरी दाखवावा, मनपाचे कर्मचारी तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप आमदार सुनील कांबळेंवर सडकून टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना थोंबाड रंगवू, अशा शब्दात इशारा दिला होता. भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली त्यावरुन, रुपाली चाकणकर यांनी भाजपा आमदार सुनिल कांबळेवर निशाणा साधला आहे.
तसेच, सुनिल कांबळेंनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरुन सुनिल कांबळे यांचा निषेध नोंदवला आहे. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. रुपाली चाकणकरांनी देखील त्यांचे नाव घेत जोरदार टीका केली आहे. पुणे मनपाचे कर्मचारी कुणाचे नोकर नाहीत. झालेल्या प्रकाराविरोधात महिला अधिकाऱ्याने तक्रार दाखल करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही यानिमित्ताने चाकणकरांनी दिली आहे.