लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील डमी उमेदवार पॅटर्न
महान कवी, नाटककार विल्यम शेक्सपिअरने म्हटलं आहे की, नावात काय आहे? मात्र, महाराष्ट्रात उंबरठ्यावर असलेल्या निवडणुकीमध्ये नावातच सारं काही असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जसे नावात साधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आले होते. तोच डमी उमेदवारांचा पॅटर्न विधानसभा निवडणुकीमध्येही पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओरिजनल उमेदवारांची मतं कमी होत असल्याचे पाहायला मिळते.
लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील डमी उमेदवार पॅटर्न
नाम साधर्म्य असलेल्या व्यक्तींनी केले उमेदवारी अर्ज दाखल
लोकसभेला गाजला होता दिंडोरीतील भगरे पॅटर्न
डमी उमेदवारांमुळे ओरिजनल उमेदवार यांचे मताधिक्य कमी होणार का?
लोकसभा निवडणुकीत दिंडोरीत भगरे पॅटर्न गाजला होता याचीच पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत होताना बघायला मिळत आहे. नामसाधर्म असलेले उमेदवार देण्यात येत असल्याने ओरिजनल उमेदवारांचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. कारण मतदारांना गोंधळात टाकून डमी उमेदवार देण्याची प्रथा बनत चालली आहे. याचा फटका मात्र ओरिजनल उमेदवारांना बसणार आहे.
भगरे पॅटर्न
लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतील भगरे पॅटर्न गाजला होता. डमी उमेदवार असलेल्या बाबू भगरे यांनी तब्बल लाखभर मते घेत खासदार भास्कर भगरे यांचे लीड कमी केले होते. त्याचीच पुनावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत देखील होताना पाहायला मिळत आहे. नाशिक पूर्व आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघात नामसाधर्म असलेले उमेदवार देण्यात आले आहे. नांदगावमध्ये तर सुहास कांदे नावाचा डमी उमेदवार उभा करण्यात आला आणि याला विशेष सुरक्षा देऊन नेण्यात आले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले गणेश धात्रक यांच्या नावाशी साधर्म्य असलेले गणेश धात्रक यांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे ओरिजनल उमेदवारांना याचा धोका पत्करावा लागणार आहे. नाशिक पूर्व मध्ये तर महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून उमेदवार असलेले गणेश गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले डमी गणेश गीते उभे करण्यात आले. डुप्लिकेट गणेश गीते यांना वीस लाख रुपयांचे आमिष देत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आणि हे सगळे भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने केल्याचा आरोप देखील गीते यांनी केला आहे. तर या संदर्भातील पुरावेच महाविकास आघाडीचे गणेश गीते यांनी माध्यमांना दिले. भाजपाच्या उमेदवाराने याचा नकार देत माझ्या बदनामीचे हे षडयंत्र आहे आणि या संदर्भात मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार भगरे पॅटर्न सुरू झाला याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेला होते. नांदगावमध्ये देखील गणेश धात्रक यांच्यासमोर दुसरा गणेश धात्रक कोणी शोधून आणला असा प्रश्न भुजबळ यांनी केला आहे. तर आता निवडणुकीसाठी सर्व काही केलं जातं असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
नाम साधर्म्य असलेले उमेदवार देऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रकार हा विधानपरिषद निवडणुकीत देखील झाला होता. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कोल्हे, गुळवे, दराडे असे नाम साधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आल्याने मोठे रणकंदन देखील झाले होते. तसाच प्रकार आता विधानसभा निवडणुकीत करून मतदारांना गोंधळात टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यावर आता निवडणूक आयोगाने काहीतरी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर या डमी उमेदवारांमुळे ओरिजनल उमेदवारांचे मताधिक्य घटणार हे मात्र नक्की.