'12वी फेल' दिग्दर्शकाच्या मुलाचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ; सलग शतके झळकावून रचला इतिहास
12वी फेल या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नी चोप्रा सध्या क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. अग्नीने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने येताच विक्रमांची मालिका रचली. मिझोरामकडून खेळताना त्याने पहिल्या 4 सामन्यात शतके झळकावली आहेत. अशाप्रकारे अग्नीने रणजी ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक विक्रम केला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणातच पहिल्या 4 सामन्यात शतक झळकावणारा अग्नी चोप्रा पहिला फलंदाज ठरला आहे. हा रेकॉर्ड सोशल मीडियावर व्हायरल होताच अग्नीची आई आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रानेही एक पोस्ट टाकून अभिमान व्यक्त केला. अग्नी चोप्राने रणजी ट्रॉफी 2024 हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले असून 95.87 च्या उत्कृष्ट सरासरीने 767 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही 111.80 राहिला आहे.
अग्नीची आतापर्यंत 4 सामन्यात कामगिरी
(166 आणि 92 धावा) वि. सिक्कीम
(166 आणि 15 धावा) वि. नागालँड
(114 आणि 10 धावा) वि. अरुणाचल प्रदेश
(105 आणि 101 धावा) वि. मेघालय
असा आहे अग्नीचा लिस्ट-ए आणि टी-20 रेकॉर्ड
आत्तापर्यंत अग्नीने लिस्ट-ए आणि टी-20 सामन्यांमध्येही चमक दाखवली आहे. त्याने आतापर्यंत 7 टी-20 सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 33.42 च्या सरासरीने 234 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्येही अग्नीने केवळ 7 सामने खेळले, यामध्ये त्याची 24.85 ची सरासरी विशेष नव्हती. यामध्ये त्याने एका अर्धशतकासह 174 धावा केल्या.