IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का

इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजानंतर आता स्टार खेळाडू केएल राहुल देखील बाहेर गेले आहेत. हे दोघेही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली आहे. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबाद येथे खेळला गेला. इंग्लंडने हा सामना 28 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटीत 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने थेट थ्रो करुन रवींद्र जडेजाला धावबाद करणे हा पहिल्या कसोटीचा ‘टर्निंग पॉईंट’ तर होताच, पण तो मालिकेची दिशाही ठरवू शकतो, कारण सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर एकचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, स्नायूच्या ताणाने त्रस्त आहे. त्यामुले रवींद्र जडेजाचे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे साशंक आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ''रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांना विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावे लागले. हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला दुखापत झाली होती, त्यानंतर राहुलनेही दुखापतीची तक्रार केली होती. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक दोघांवर लक्ष्य ठेवून आहे.''

बीसीसीआयने सांगितले की, ''निवड समितीने सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश केला आहे. गरज पडल्यास आवेश खानही कसोटी संघात सामील होईल.''

दरम्यान, जडेजा आणि राहुलच्या अनुउपस्थिती तीन खेळाडूंचे नशीब उजळले. स्टार फलंदाज सर्फराज खानशिवाय अष्टपैलू सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. सर्फराजने गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 69.85 च्या उत्कृष्ट सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. सर्फराजचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com