बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय! महिला व पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन मिळणार

बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय! महिला व पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन मिळणार

जय शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये यापुढे महिला आणि पुरुषांमध्ये वेतनाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान मॅच फी म्हणजेच वेतन मिळेल, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली आहे. जय शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.

जय शहा म्हणाले की, भेदभाव दूर करण्यासाठी बीसीसीआयने पहिले पाऊल उचलले आहे. आम्ही महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समानता धोरण लागू करत आहोत. आम्ही आता लैंगिक समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत. अशा स्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी असेल. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरुषांना कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी ६ लाख रुपये दिले जातात. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना ३ लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला क्रिकेटपटूंनाही दिली जाणार आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल जय शहा यांनी सर्वोच्च परिषदेचेही आभार मानले आहेत, अशी माहिती शहा यांनी दिली आहे.

महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये तुलना केली तर आतापर्यंत ज्येष्ठ महिला क्रिकेटपटूंना सामन्यासाठी प्रतिदिन २० हजार रुपये मिळत होते. ते 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेटपटूच्या बरोबरीचे होते. तर वरिष्ठ पुरुष खेळाडूंना सरासरी ६० हजार रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून मिळतात. त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यात मोठा फरक होता. पण आता हा भेदभावही दूर होणार आहे.

दरम्यान, क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांना समान वेतन देण्याचा उपक्रम पहिल्यांदा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यावर्षी जुलैमध्ये राबविला होता. त्यांनी महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. एनझेडसी आणि 6 मोठ्या असोसिएशनमध्ये याबाबत करारही झाला होता. हा करार पहिल्या पाच वर्षांसाठी करण्यात आला होता. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटपटूंनाही सर्व स्पर्धांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी समान शुल्क मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com