Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्याबाबतचा 'तो' सस्पेन्स संपला! ACC ने केली महत्त्वाची घोषणा
आशिया कप 2025 या बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धेचं आयोजन यंदा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये होणार आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत 2 गट तयार करण्यात आले असून, भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच गटात सामील करण्यात आलं आहे. 14 सप्टेंबर रोजी या दोन संघांमध्ये साखळी फेरीतील सामना होणार आहे.
एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) ने अखेर या स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन कोणत्या ठिकाणी होणार, याबाबतचा सस्पेन्स दूर केला आहे. 2 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, सर्व सामने अबुधाबी आणि दुबईतील स्टेडियममध्येच खेळवले जाणार आहेत. याआधी फक्त यूएई देशाचं नाव स्पष्ट करण्यात आलं होतं, मात्र नक्की कोणत्या शहरांमध्ये सामने होतील, हे सांगितलं नव्हतं.
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या सामन्यावर नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असून, काही क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानविरोधातील सामनेही बहिष्कृत केले होते.
त्यामुळे आशिया कपमधील हा सामना होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होतो. तथापि, एसीसीने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये 14 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल, असे अधिकृतरित्या घोषित केलं आहे. तसेच, साखळी फेरीनंतर हे दोन संघ पुन्हा सुपर 4 किंवा अंतिम फेरीत आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय संघाला साखळी फेरीत तीन सामने खेळायचे आहेत:
10 सप्टेंबर – दुबई (विरुद्ध अद्याप न जाहीर झालेला संघ)
14 सप्टेंबर – दुबई (विरुद्ध पाकिस्तान)
19 सप्टेंबर – अबुधाबी (विरुद्ध ओमान)