Cricket News : त्याने स्पष्ट नकार दिला तरी धावला अन्..., फलंदाजाने पिचवरच बॅट फेकून साथीदारावर काढला राग; Video Viral

Cricket News : त्याने स्पष्ट नकार दिला तरी धावला अन्..., फलंदाजाने पिचवरच बॅट फेकून साथीदारावर काढला राग; Video Viral

पाकिस्तान शाहीनच्या डावादरम्यान ख्वाजा नफी आणि यासिर खान आक्रमक फलंदाजी करत असताना अनपेक्षित प्रसंग घडला.
Published by :
Team Lokshahi
Published on

पाकिस्तान शाहीनच्या डावादरम्यान ख्वाजा नफी आणि यासिर खान यांनी दमदार सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी तब्बल 118 धावांची भागीदारी रचली. यावेळी नफी आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने 31 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांची झळाळती खेळी केली.

तथापि, 12 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अनपेक्षित प्रसंग घडला. यासिर खान मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चुकला, चेंडू त्याच्या पॅडला लागून पिचवरच थांबला. याच क्षणी नफीने वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण यासिरने स्पष्ट नकार दिला. दरम्यान नफी क्रीजवर परत येईपर्यंत चेंडू नॉनस्ट्रायकर टोकाला पोहोचला आणि बेल्स उडाल्या. परिणामी तो धावबाद झाला.

रनआउट झाल्यानंतर संतापलेल्या नफीने मैदानातच आपला बॅट जोरात फेकला. त्याच वेळी त्याने यासिर खानकडे पाहत मोठ्याने काहीतरी बोलल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे प्रसंग क्वचितच दिसतात, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूकडून असा संताप व्यक्त केल्यामुळे पाकिस्तान संघावर टीका होत आहे.

वादग्रस्त प्रसंग असूनही पाकिस्तान शाहीनने हा सामना एकतर्फी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकांत फक्त 4 गडी गमावून तब्बल 227 धावा फटकावल्या. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत बांगलादेश ‘ए’ ला 16.5 षटकांत 148 धावांवर रोखले.

गोलंदाजीत शाद मसूद आणि फैजल अकरम यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. मोहम्मद वसीम याने 2 तर उबैद शाह आणि माज सदाकत यांनी प्रत्येकी 1 बळी टिपत बांगलादेशच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले.

पाकिस्तान शाहीनचा पुढील सामना 16 ऑगस्ट रोजी पर्थ स्कॉर्चर्स अकॅडमीविरुद्ध होणार आहे. दरम्यान, रनआउटवरून उफाळलेला वाद सोशल मीडियावर रंग घेत असून चाहत्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण नफीच्या संतापाचा निषेध करत आहेत, तर काहींच्या मते खेळात अशा भावना कधी कधी अनावर होतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com