Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम
भारताने आशिया कपमधील सुपर–4 सामन्यात पाकिस्तानवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुरू झालेल्या "नो–हँडशेक" वादाचा परिणाम आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपाशी (ICC) औपचारिक तक्रार नोंदवून थेट सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढेच नव्हे तर, मागणी मान्य न झाल्यास एशिया कप बहिष्काराची धमकी देत PCB ने क्रिकेटविश्वात खळबळ माजवली आहे.
सामन्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना PCB चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी स्पष्ट केले की, "सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी MCC च्या नियमावलीला छेद देत खेळभावनेचे उल्लंघन केले आहे. टॉसवेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना हस्तांदोलन करू नये, अशा प्रकारचे निर्देश देणे पूर्णतः चुकीचे व पूर्वग्रहदूषित आहे."
PCB च्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे सामना संपल्यानंतर खेळाडूंमध्ये परंपरेनुसार हस्तांदोलन झाले नाही आणि त्यावरून अनावश्यक वाद पेटला. त्यामुळे अँडी पायक्रॉफ्ट यांना तातडीने रेफरी पॅनेलमधून हटवावे, अशी अधिकृत मागणी बोर्डाने ICC समोर ठेवली आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, पायक्रॉफ्ट यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास पाकिस्तानने येत्या 17 सप्टेंबरला UAE विरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, पुढील पायरीवर जाऊन एशिया कपच्या उर्वरित सामन्यांतून पूर्णपणे माघार घेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, PCB या मुद्द्यावर "मोठा निर्णय" घेण्याच्या तयारीत असून यामुळे एशिया कपची संपूर्ण स्पर्धा संकटात येऊ शकते. पायक्रॉफ्ट यांच्यावरचा मुख्य आरोप असा की, भारत–पाकिस्तान सामन्यात त्यांनी खेळभावनेच्या विरुद्ध जाऊन हस्तांदोलन रोखले. याशिवाय PCB ने केलेल्या तक्रारीवरही त्यांनी वेळेत कार्यवाही न केल्याने त्यांच्याविरोधात नाराजी अधिक तीव्र झाली आहे.
आशिया खंडातील क्रिकेटमध्ये भारत–पाक लढती नेहमीच तणावपूर्ण असतात. मात्र या वेळेस मैदानाबाहेरचा "हँडशेक वाद" अधिक तापू लागला आहे. पाकिस्तानच्या बहिष्काराच्या धमकीनंतर ACC आणि ICC वर मोठा दबाव निर्माण झाला आहे. पुढील काही तासांत या प्रकरणावर कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.